राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास
प्रस्तावना :
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली.
स्वावलंबन, चारित्र्यवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पध्दतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे २४ सप्टेंबर १९६९ साली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येत आहे.
इतिहास :-
राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रारंभ करण्यासंबंधीची संकल्पना ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु यांची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील तरुणांनी विशेषत: महाविद्यालयीन आणि विद्यापीठीीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहीजे. भारत हा खेड्यांचा देश असल्या कारणाने खेड्यातील जनतेला स्वातंत्र्याची सर्व फळे उपभोगता आली पाहिजे. यासाठी त्यांना कार्यप्रवण केले पाहिजे. म्हणून १९५० मध्ये विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी युगातील आदर्श शिक्षण क्षेत्रांत राबविण्यासाठी विचार विनिमय करण्याच्या हेतुने जानेवारी १९५० मध्ये एक बैठक आयोजित केली. त्या आधारे १९५२ मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत समाजसेवा आणि शारीरिक श्रम यावर अधिक भर देणारी विद्यार्थ्यांची शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली. १९५८ मध्ये जवाहरलाल नेहरुंनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करताना नऊ महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत समाजसेवेचे ग्रामीण भागात कार्य करावे अशा प्रकारची एक योजना आखावी असे सुचविलेले होते. १९५९ च्या शिक्षण मंत्र्यांच्या दिल्ली येथील बैठकीत अशा प्रकारची योजना तयार करावी म्हणून एका समितीची स्थापना डॉ.सी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आली. या समितीने अतिशय महत्वाच्या शिफारशी केल्या. १९६० मध्ये प्रा.के.जी. सय्यदीन यांनी वेगवेगळया देशांचा अभ्यास करुन नॅशनल सर्व्हीस फॉर द युथ हा अहवाल दिला. १९६४ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण सुधारणा आयोगाचे अध्यक्ष डॉ. दौलतसिंह कोठारी यांनी आपल्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांनी समाजसेवा करण्यासंबंधी कोणत्या प्रकारच्या योजना राबवाव्यात यासंबंधीची शिफारस केली. मे १९६९ मध्ये कुलगुरुंच्या उपसमितीची बैठक होऊन राष्ट्रीय सेवा योजनेचा मसुदा तयार करण्यात आला आणि २४ सप्टेंबर १९६९ रोजी त्यावेळचे शिक्षणमंत्री डॉ. व्ही.के. आर.व्ही राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरु केल्याची घोषणा केली. महात्मा गांधी विचारांना राबविण्यासाठी, पंडित जवाहरलाल नेहरुंचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने सुरु करण्यात आली. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या योजनेमुळे महाविद्यालयीन विद्यापीठीय युवकांना राष्ट्रीय छात्र सेनेप्रमाणे समाजसेवा आणि राष्ट्रसेवा करण्याची नवी संधी मिळत आहे, असे म्हटलेले होते.
१९६९ मध्ये एक पायलट स्वरुपात देशातील केवळ ३७ विद्यापीठांत आधि के ४० हजार विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. हळूहळू ही योजना विस्तारली. सध्या देशातील विद्यापीठांतील ८ हजार महाविद्यालयातील २२ लाखाहून अधिक विद्यार्थी या योजनेत सक्रिय सहभागी आहेत. यावरुन या योजनेची विद्यार्थी वर्गातील आत्मियता लक्षात येते.
राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे :-
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करणे, समाजसेवेच्या माध्यमातून स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे. या उद्देशाने ही योजना सुरु झाली. तिची प्रमुख उदिष्टे खालीलप्रमाणे :
१) ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे.
२) स्वत:ला संबंधित समाजाला समजून घेण्यासाठी पात्र बनविणे.
३) समाजाच्या गरजांची माहिती करुन घेणे, त्याच्या अडचणी समजून घेणे. व त्या दूर करणे की, ज्यामुळे तो समाज सक्रीय बनेल.
४) आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करुण तिचा विकास करणे.
५) आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामाजिक अडचणी दूर करुन त्यावर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी करणे. ६) समाजात मिसळण्यासाठी ज्या गुणांची गरज आहे. त्या गुणांचा आपल्यामध्ये विकास करणे.
७) नेतृत्व गुण धारण करुन लोकशाही प्रवृत्तीचा विकास करणे.
८) साक्षर व निरक्षर यांच्यातील दरी कमी करणे.
९) राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व विकास करणे.
१०) समाजातील गरीबवग्गाची सेवा करण्याची इच्छा मनात जागृत करणे.


0 Comments
नमस्कार! या विषयाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल, तर कृपया खाली कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.